GRAMIN SEARCH BANNER

दुर्दैवी! जन्मानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी नवजात बालकाचा मृत्यू

Gramin Search
6 Views

रत्नागिरी : जन्मानंतर अवघ्या चार दिवसांच्या एका नवजात बालकाचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी रात्री ८.४० वाजता घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालकाला जन्मापासूनच काही शारीरिक त्रास जाणवत होता. २४ जून रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बालकाला संडास झाली. त्यानंतर त्याच्या नाकातून लालसर फेसासारखे द्रव्य येऊ लागले आणि त्याची त्वचा पिवळसर दिसू लागली. ही गंभीर लक्षणे दिसल्याने पालकांनी तात्काळ त्याला निर्मल बाल रुग्णालय, साळवी स्टॉप येथे दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, अधिक उपचारांसाठी बालकाला तातडीने रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एस.एन.सी.यू. विभागात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बालकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री ८.४० वाजता डॉक्टरांनी तपासणी करून बालकाला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात २५ जून रोजी आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2647119
Share This Article