गुहागर/ उदय दणदणे: गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाच्या अनास्थेमुळे गुहागर तालुक्यातील निवोशी गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून गावातील रस्त्यांची दुरवस्था सुधारली आहे. कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली होती. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने, सणासुदीच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला.
स्थानिक जागृत विकास मंडळाचे अध्यक्ष विजय अवेरे यांच्या नेतृत्वाखाली रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी हे श्रमदान करण्यात आले. यात नाणेवाडी, कातळवाडी आणि गणेशवाडीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वरवेली रांजणेवाडी ते निवोशी या महत्त्वाच्या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात आला, तसेच रस्त्याच्या कडेची झाडीही साफ करण्यात आली. याशिवाय, मळण निवोशी पालशेत रस्त्यावरही साफसफाईचे काम करण्यात आले.
प्रशासन आणि राजकारणी यांच्याकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून, ग्रामस्थांना नाईलाजाने हे काम हाती घ्यावे लागले, असे विजय अवेरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या श्रमदानासाठी शशी लोखंडे यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सणासुदीच्या दिवसांतही नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी स्वतःच कष्ट करावे लागत आहेत, ही बाब या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे.