संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. धामणी येथील श्रद्धा हॉटेलचे उद्योजक प्रभाकर घाणेकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याने पाळलेल्या मांजरावर झडप घालून त्याला घेऊन जातानाचा थरारक प्रसंग कैद झाला आहे. या घटनेमुळे धामणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धामणी हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्याने हॉटेल्स आणि पेट्रोल पंपांमुळे येथे दिवसरात्र वर्दळ असते. असे असतानाही या वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. काल रात्रीपासून प्रभाकर घाणेकर यांचे पाळलेले मांजर अचानक गायब झाले होते. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र मांजर सापडले नाही. त्यानंतर त्यांनी घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, धक्कादायक प्रकार समोर आला.
फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मांजर घराशेजारी बसलेले असताना एका बिबट्याने त्यावर झडप घातली आणि त्याला उचलून थेट जंगलाच्या दिशेने नेले. हा थरार पाहून घाणेकर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत.
या प्रकारामुळे धामणी परिसरात बिबट्याचा धोका वाढल्याचे सिद्ध झाले आहे. प्रभाकर घाणेकर यांनी वनविभागाने या धोकादायक परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. वनविभागाने तात्काळ कारवाई न केल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण बिबट्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.