चिपळूण: तालुक्यातील खेंड-कांगणेवाडी येथे एका पतीने किरकोळ कारणावरून पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बाथरूमला जाण्यावरून झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला केबलने मारहाण केली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. पल्लवी स्वप्नील कदम (वय २९) या त्यांच्या पती स्वप्नील कदम (वय ३२) आणि मुलीसोबत खेड-कांगणेवाडी येथे राहतात. घटनेच्या दिवशी सकाळी स्वप्नील कदम झोपेतून उठल्यानंतर बाथरूमला जाण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी त्यांची मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करत होती. घरात एकच बाथरूम असल्याने त्यांना थांबावे लागले. यामुळे स्वप्नील यांचा संयम सुटला आणि ते संतापले. रागाच्या भरात त्यांनी पत्नी पल्लवी आणि मुलगी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पल्लवी यांना हाताने मारहाण केली आणि घरात असलेल्या चार्जिंगच्या केबलने पाठीवर आणि हातावर मारले. ‘तुला ठार मारून टाकीन’ अशी धमकीही त्यांनी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पल्लवी कदम यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.
पल्लवी कदम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्नील कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
चिपळूण : बाथरूममध्ये जाण्यावरून पतीची पत्नीला जबर मारहाण
