GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाबाबत राजपत्र जारी, शेतकऱ्यांना चारपट मोबदला

Gramin Varta
116 Views

कोल्हापूर: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील किलोमीटर १४५ ते किलोमीटर १८१ या अंकली ते चोकाक दरम्यान रस्तेकामासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आठ गावांतून हा महामार्ग जाणार असून, अधिग्रहण केल्या जाणाऱ्या जमिनीला सरकारने रेडिरेकनरच्या चौपट दर देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध संपला असून, आता रस्ता उभारणीची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

४३१ गटातून हा रस्ता जाणार असून, सुमारे ४४ हेक्टर क्षेत्र अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होती. त्यात मजले, हातकणंगले, चोकाक, जैनापूर, उमळवाड, उदगाव, तमदलगे, निमशिरगाव या गावांचा समावेश आहे. बहुतांश क्षेत्र हे शेतीचे आहे. काही ठिकाणी अकृषक क्षेत्र आहे.

राजपत्रात उल्लेख करण्यात आलेली जमीन आता केंद्र सरकारच्या मालकीची होणार असून, त्यावर रस्ते उभारणीच्या कामाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी ते नागपूर महामार्गातील अत्यंत महत्त्‍वाचा अंकली ते कोल्हापूर हा टप्प्या पूर्ण करण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी या टप्प्यातील जमीन अधिग्रहणाबाबतची अधिसूचना २० जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर बऱ्याच हरकती दाखल झाल्या. शेतकऱ्यांनी मोबदल्यावरून तीव्र आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्याबाबत आवाज उठविला.

या महामार्गाला याआधी जे भूमी अधिग्रहण झाले होते, त्याला ज्या पद्धतीने मोबदला मिळाला तोच कायम ठेवावा. चारपट मोबदला मिळावा, अशी मागणी केली होती. ती अखेर मान्य झाली आणि अंकली ते चोकाक उर्वरित टप्प्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या राजपत्रामुळे ही जमीन आता केंद्र शासनाच्या व पर्यायाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात जाणार आहे.

अंकली ते चोकाक महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पाइपलाइन, गोठा, इमारती, झाडे आदींची मिळणारी भरपाई योग्य पद्धतीने मिळायला हवी. त्याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत, अशा पद्धतीने काम व्हावे. तक्रार आली तर आम्ही प्राधिकरणाला जाब विचारू. सर्व शेतकऱ्यांनी सध्या चालू प्रक्रियेवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे. फसगत होणार नाही, याची काळजी घ्यावी. आम्ही सोबत आहोत.– राजू शेट्टी, माजी खासदार

Total Visitor Counter

3072260
Share This Article