रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही कुत्री झुंडीने फिरत असून लहान मुले, वयोवृद्ध तसेच दुचाकीस्वारांवर हल्ले करत आहेत. मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल २,३२७ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. सुदैवाने या काळात एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही.
शहरातील साळवी स्टॉप, जे. के. फाईल्स, मारुती मंदिर, कोकणनगर, मजगाव, जयस्तंभ, एसटी बसस्थानक, मांडवी, कारवांचीवाडी, लक्ष्मी चौक आणि रेल्वे स्टेशन परिसर या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या विशेषतः वाढली आहे. अनेक ठिकाणी हे कुत्रे नागरिकांचा पाठलाग करत अंगावर धावून येत आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निर्बीजीकरण मोहीम निष्फळ
रत्नागिरी, खेड आणि चिपळूण या शहरांमध्ये कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लाखो रुपये खर्च करून मोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी न होता उलट वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक चावे
जिल्ह्यातील सर्वाधिक ५३७ श्वानदंश रत्नागिरी तालुक्यात नोंदवले गेले आहेत. वेळीच उपचार मिळाल्याने सर्व रुग्णांची प्रकृती सुधारली आहे.
कचऱ्यातून मिळते ‘भोजन’, कुत्र्यांचे टोळके हिंस्र
अनेक गावांमध्ये कचरा वेळेवर न उचलल्याने कुजलेले अन्नपदार्थ, मासळी, मटण व इतर टाकाऊ पदार्थ रस्त्यांवर पडून राहतात. त्यामुळे कुत्र्यांची झुंड येथे जमते. हॉटेल्स आणि चायनीज सेंटरसमोरही कुत्र्यांची मोठी गर्दी असते. हे कुत्रे मांसाहारी पदार्थ मोठ्या प्रमाणात खात असल्याने अधिक आक्रमक आणि हिंस्र बनत आहेत.
दापोलीत चिमुकलीवर हल्ला
गेल्या महिन्यात दापोली शहरात एका मोकाट कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला करून तिला जखमी केले होते. तालुक्यातील इतर भागांमध्येही अशा घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 9 महिन्यात 2327 जणांना श्वानदंश
