तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र व अर्जुना माध्यमिक विद्यालय, कारवलीचे मुख्याध्यापक राजेश राजाराम तेरवणकर यांचे आज दुपारी रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अनपेक्षित निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजेश तेरवणकर यांच्या वडील राजाराम तेरवणकर हे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर आई अंगणवाडी सेविका म्हणून सेवेत होती. पत्नीने नुकतेच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कुटुंबात आई, वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
तळवडे गावातील विविध सामाजिक क्षेत्रात ते अग्रेसर होते. श्री रामेश्वर मित्र मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारीने काम पाहिले. मूळचे तळगाव येथील असलेल्या तेरवणकर यांनी उच्च शिक्षण नेर्ले (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे घेतले.
१९९७ पासून अर्जुना खोरे विकास मंडळ-कारवली शिक्षण संस्थेच्या अर्जुना माध्यमिक विद्यालय, कारवली येथे त्यांनी सहायक शिक्षक म्हणून कार्यरत राहून शैक्षणिक वाटचाल सुरू केली. १ मे २०२४ रोजी त्यांची त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. कमी कालावधीतच त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांची मनं जिंकत शाळेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
त्यांच्या अकाली निधनाने तळवडे गाव, कारवली परिसर व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
तळवडे गावचे सुपुत्र व मुख्याध्यापक राजेश तेरवणकर यांचे हृदयविकाराने निधन
