GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नगर परिषदेची अनधिकृत फलकांवर धडक कारवाई: क्यूआर कोड नसलेले तीन फलक जप्त

चिपळूण: शहरात अनधिकृत फलकबाजीला आळा घालण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने कंबर कसली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या विशेष पथकाने सोमवारी (७ जुलै ) शहरात लावलेले क्यूआर कोड नसलेले तीन मोठे फलक जप्त केले. हे फलक सध्या नगर परिषद कार्यालय परिसरात ठेवण्यात आले आहेत.

राज्य शासनाने आता अनधिकृत फलकबाजीला पूर्णविराम देण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. या नियमानुसार, शहरात किंवा कोणत्याही गावात फलक लावण्यासाठी संबंधित नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यानंतर संबंधितांना एक क्यूआर कोड दिला जातो, जो फलकावर छापण्याची अट आहे. या क्यूआर कोडमुळे फलकाची अधिकृतता तपासणे शक्य होते.

याच नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने एक विशेष पथक तयार केले आहे. हे पथक दररोज शहरात गस्त घालून क्यूआर कोड नसलेल्या फलकांवर कारवाई करत आहे. याच मोहिमेअंतर्गत सोमवारी शहरात लावण्यात आलेले तीन मोठे फलक क्यूआर कोडविना आढळल्याने ते जप्त करण्यात आले आणि नगर परिषद कार्यालयात आणून ठेवण्यात आले.
ही कारवाई मुख्याधिकारी विशाल भोसले आणि बांधकाम विभाग प्रमुख संदेश टोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नगर परिषदेच्या या धडक कारवाईमुळे शहरात अनधिकृत फलक लावणाऱ्यांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे.

Total Visitor

0224921
Share This Article