खेड : जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी लोकसहभागातून उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी ‘मिशन नेत्रा’ प्रकल्प सध्या देखभाल-दुरुस्तीअभावी ठप्प झाला आहे. त्यामुळे शहरातील गजबजलेल्या भागांत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचे संख्याबळ कमी असताना वाढती गुन्हेगारी हे आव्हान पेलण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘मिशन नेत्रा’ उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. शहरांचा विस्तार आणि वाढती वाहतूक लक्षात घेऊन शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यासाठी लोकसहभागातून निधी संकलित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, दुबई येथील उद्योजक बशीर हजवानी यांनी हजवानी फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमासाठी मोठी आर्थिक मदत केली होती.
शहरातील बसस्थानक, निवाचा चौक, गांधी चौक, तीन बत्ती नाका आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, मात्र अल्पावधीतच ही संपूर्ण यंत्रणा डबघाईस आली आहे. सध्या खेड शहर परिसरातील अनेक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणी बसवलेली लाऊडस्पीकर यंत्रणाही धूळखात पडली असल्याने वाहतूक नियंत्रणही अडथळ्यांत सापडले आहे. इतकेच नाही तर, अनेक कॅमेऱ्यांच्या आजूबाजूला पावसाळ्यात वेलींचा विळखा पडलेला असून, ‘मिशन नेत्रा’ कोमात गेल्याची स्थिती आहे.
या गंभीर स्थितीवर बोलताना खेडचे पोलीस निरीक्षक विकास अहिरे यांनीही कॅमेरे बंद असल्याची सत्य परिस्थिती मान्य केली आहे. ते म्हणाले, “काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. यासंदर्भात ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे, त्यांच्याकडून आम्ही या यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करून घेऊ. तसेच ‘मिशन नेत्रा’अंतर्गत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करू.” पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ही यंत्रणा सुस्थितीत करावी, अशी आग्रही मागणी खेडवासीयांकडून केली जात आहे.