GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये कर्ज वसुलीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Gramin Varta
859 Views

‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दुसरा गुन्हा; मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक

चिपळूण: शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मायक्रो फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कर्ज वसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून खेड न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आदित्य समीर बने (वय २५, रा. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आदित्य हा शहरातील एका मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज वसुलीचे काम करत होता. पीडित मुलीच्या आईने याच कंपनीतून कर्ज घेतले होते. कर्ज वसुलीच्या निमित्ताने आदित्यचे पीडितेच्या घरी वारंवार येणे-जाणे होते.

याच ओळखीतून त्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी आदित्य बने याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी बुधवारी चिपळूणमध्ये विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात ने-आण करणाऱ्या व्हॅनचा चालक वहाब वावेकर याने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. त्या प्रकरणीही ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमुळे संपूर्ण चिपळूण शहरात तीव्र संतापाची भावना पसरली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. समाजातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडूनच असे घृणास्पद कृत्य घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

2663853
Share This Article