GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते संगमेश्वर दरम्यान तात्पुरती करणार मलमपट्टी; आंदोलन स्थगित

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनावर तात्पुरता तोडगा निघाला असून, आरवली ते संगमेश्वर दरम्यानचा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी मलमपट्टी करून सुसह्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलन सध्या तरी स्थगित करण्यात आले आहे.

रविवारी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आंदोलनकर्ते आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दोन्ही गटांना चर्चेसाठी एकत्र बसवले होते.

या बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कुलकर्णी, पाटील यांच्यासह अन्य स्थानिक यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांत राहुल रविंद्र गुरव, राजेंद्र पोमेंडकर, विवेक शेरे, रौफ खान, गणपत चव्हाण, बाळू इंदुलकर, प्रज्योत पवार, महेंद्र चकरी, वैभव चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

बैठकीत रस्त्याच्या अत्यंत खराब झालेल्या अवस्थेवर, अपघातग्रस्त क्षेत्रांमध्ये दिशा दर्शक फलक नसल्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांवर, शाळा-विद्यालयांसमोरील खड्ड्यांवर तसेच अपूर्ण कामानंतर उघडे ठेवलेले खड्डे, ओव्हरलोड ट्रकची दगडमाती वाहतूक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
प्राधिकरणाने येत्या १०-१२ दिवसांत आरवली ते संगमेश्वर दरम्यान असलेले सर्व खड्डे तात्पुरते भरून काढण्याचे आश्वासन दिले असून, कामांची पाहणी संबंधित अधिकारी स्वतः करतील, असेही सांगण्यात आले.

या आश्वासनांमुळे आंदोलकांनी सध्या आंदोलन मागे घेतले असले, तरी कामांची गती व दर्जा योग्य नसेल, तर स्थानिक जनतेच्या सहभागाने पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी अधिकाऱ्यांना दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळावा, खड्डेमय रस्त्यांची सुटका व्हावी आणि रखडलेली कामे मार्गी लागावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती.

Total Visitor Counter

2455626
Share This Article