चिपळूण : “सगळं संपलं” असे वाटत असतानाच तातडीचा निर्णय, तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा यांच्या जोरावर मृत्यूवर मात केल्याची थरारक घटना अपरांत हॉस्पिटलमध्ये घडली आहे. ५७ वर्षीय मंदिराचे पुजारी असलेल्या रुग्णाने सेप्टिक शॉकसह गंभीर हृदयविकाराच्या अवस्थेतून यशस्वी पुनरागमन करत वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
संबंधित रुग्णाची काही वर्षांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती.“हृदय कमजोर आहे,” असा स्पष्ट इशारा डॉक्टरांनी दिला होता आणि त्यानुसार नियमित औषधोपचार व तपासण्या सुरू होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जाणवणारा थकवा, श्वास घेण्यास होणारा त्रास आणि पोटातील अस्वस्थता याकडे दुर्लक्ष झाले.
एका रात्री अचानक रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास, वाढलेली हृदयधडधड, SPO2 ८८ टक्के, रक्तदाब १६०/८०, नाडी १२०, तसेच पोट फुगणे व असह्य वेदना यामुळे रुग्णाला तातडीने अपरांत हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले.
रुग्णाला त्वरित ICU मध्ये हलवून NIV मास्कद्वारे उच्च दाबाने ऑक्सिजन देण्यात आला. तपासण्यांमध्ये NT-pro BNP व Cardiac Markers वाढलेले आढळून आले, ज्यामुळे हृदयाची स्थिती अत्यंत कमजोर असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक उद्दिष्ट होते – हृदय वाचवणे!
मात्र तपासणीदरम्यान एक धक्कादायक वास्तव समोर आले. छातीच्या एक्स-रेमध्ये Gas under diaphragm दिसून आले, जे न्यूमोपेरीटोनियमचे स्पष्ट लक्षण होते. याचा अर्थ पोटातील एखादा अवयव फुटलेला होता – ही अवस्था थेट जीवावर बेतणारी होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत ICU टीमने तात्काळ निष्णात शल्यचिकित्सक डॉ. सद्गुरु पाटणकर यांना पाचारण केले. पुढील CT स्कॅनमध्ये स्पष्ट झाले की, वारंवार उपवासामुळे पोटातील आम्ल वाढून जठराचा अल्सर झाला होता आणि तो फुटून संपूर्ण पोटात संसर्ग पसरला होता.
नातेवाईकांना माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले,
“जठराच्या lesser curvature भागात सुमारे १ सें.मी.चे छिद्र आहे. तातडीची शस्त्रक्रिया झाली नाही तर हृदय, फुफ्फुसे, किडनी, लिव्हर अशा सर्व महत्त्वाच्या अवयवांचे अपयश होऊ शकते.”
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्वरित शस्त्रक्रियेची संमती देण्यात आली.
रात्री ठीक २ वाजता Exploratory Laparotomy शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. पोटात मोठ्या प्रमाणात पस, मुक्त हवा, तीव्र संसर्ग आणि रक्तस्राव अशी अत्यंत कठीण परिस्थिती असतानाही डॉ. पाटणकर यांनी आपल्या ३५ वर्षांच्या अनुभवाच्या बळावर क्लिनिंग, ड्रेनेज व परफोरेशन बंद करण्याची जीवनरक्षक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
या संपूर्ण उपचार प्रक्रियेत डॉ. होन, डॉ. गायकवाड, डॉ. भक्ती, डॉ. प्राची, तसेच अनुभवी OT व नर्सिंग स्टाफ यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अत्याधुनिक ICU सुविधा आणि एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या मल्टीस्पेशालिटी सेवांमुळे रुग्णाने Septic Shock with Cardiac Complications या जीवघेण्या अवस्थेवर विजय मिळवला.
सलग १० दिवसांच्या ICU उपचारानंतर रुग्ण पूर्णतः स्थिर होऊन सुखरूप घरी परतला. ही घटना म्हणजे केवळ एका रुग्णाचा जीव वाचल्याची कथा नाही, तर“तातडीचा निर्णय, तज्ज्ञ डॉक्टर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची ताकद” यांचे जिवंत उदाहरण आहे.
पोट फाटले, हृदय थांबण्याच्या उंबरठ्यावर अपरांत हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी उपचारांनी पुजाऱ्याचे प्राण वाचले






