90% सबसिडीसह विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांची माहिती
राजन लाड / जैतापूर
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील कांदळवन कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक आणि रोजगाराभिमुख योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी जैतापूर ग्रामपंचायत येथे महिला बचत गटांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात कांदळवन कक्षाच्या प्रिया कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन करत शिंदाणे पालन, खेकडे पालन, कालवे निर्मिती, शोभिवंत मासे निर्मिती व मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती यासारख्या प्रकल्पांची माहिती दिली. या प्रकल्पांसाठी शासनामार्फत 90% पर्यंत अनुदान (सबसिडी) मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामध्ये महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, प्रशिक्षणाची प्रक्रिया, अर्जपद्धती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. शिबिरामध्ये सहभागी महिलांनी योजनांबाबत विशेष उत्साह दर्शवला.
व्यासपीठावर जैतापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजप्रसाद राऊत, ग्रामसेवक गराटे आणि त्रिवेणी लोकसंचलित केंद्राचे व्यवस्थापक राजन लाड उपस्थित होते. त्यांनीही महिलांना मार्गदर्शन करत शासनाच्या या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिराच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांना पर्यावरणसंवर्धन व उत्पन्नवाढीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काळात प्रत्यक्ष प्रकल्प राबविण्याची तयारी दर्शवली जात आहे.