GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीचा ऑस्ट्रेलियात झेंडा! रोहन काळे यांची १०४.८ किमी मॅरेथॉनमध्ये अभूतपूर्व कामगिरी

Gramin Varta
144 Views

रत्नागिरी : परदेशात राहूनही मनाने आपल्या मातृभूमीला विसरले नाही, याचा आणखी एक झगमगता पुरावा म्हणजे मुळचे रत्नागिरीचे आणि सध्या मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे वास्तव्यास असलेले रोहन काळे. रोहन यांनी २२ तासांत विश्वविख्यात माउंट कोझिओस्को या पर्वतावरची १०४.८ किमी अल्ट्राट्रेल मॅरेथॉन पूर्ण करून असामान्य पराक्रम केला आहे. ही कामगिरी म्हणजे रत्नागिरीच्या शिरपेचात भरलेला खऱ्या अर्थाने मानाचा तुरा!

मारुती मंदिराजवळील पटवर्धनवाडीचे रहिवासी असलेले रोहन काही वर्षांपासून मेलबर्नमध्ये स्थायिक आहेत. लहानपणापासूनच धावण्याची आवड जपलेला हा तरुण आज जागतिक पातळीवरही रत्नागिरीचे नाव उजळवत आहे.

माउंट कोझिओस्कोवरील ही शर्यत जगातील अतिशय कठीण मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक मानली जाते. ४१०६ मीटर उंचीच्या चढाईसोबत प्रचंड वारा, मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी बर्फाचे थर—अशा जीवघेण्या आव्हानांमधून मार्ग काढत रोहन यांनी ही कष्टप्रद शर्यत पूर्ण केली. २८ तासांची मर्यादा असताना रोहन यांनी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता धाव सुरू करून २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता फिनिश लाईन पार करत इतिहास घडवला.

रोहन यांचे प्राथमिक शिक्षण फाटक प्रशाला आणि फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी येथे झाले. यापूर्वीही त्यांनी सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून मेलबर्न येथे त्यांनी आयर्नमॅन (लोहपुरुष) हा किताबही आपल्या नावावर केला आहे.

रोहन यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीने रत्नागिरीकरांच्या अभिमानात आणखी भर पडली आहे. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे तिसरे पर्व आयोजित केले असून, रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन तंदुरुस्तीची वाटचाल सुरू ठेवावी, असे आवाहन फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3376953
Share This Article