राजापूर/ राजन लाड: राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर आणि विस्तीर्ण समुद्राच्या साक्षीने वसलेल्या अणसुरे गावात आज, शुक्रवारी देव दीपावलीच्या पवित्र पर्वावर भक्तीचा मळा फुलणार आहे. बारा वाड्यांचे ग्रामदैवत आणि नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या टेकडीवरील श्री देवगिरेश्वर मंदिरात यात्रोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण गाव उत्सवासाठी सज्ज झाले आहे. कोकणातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या या मंदिरात आज दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
देव दीपावलीचे औचित्य साधून श्री देवगिरेश्वर देवालय ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी या भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिवाळीतील देवतांचे स्वागत मानल्या जाणाऱ्या या दिवशी मंदिर परिसर लक्षवेधी रोषणाई आणि दीपप्रज्वलनाने उजळून निघणार आहे. यात्रोत्सवाची सुरुवात सकाळी ११ वाजता पालखीच्या पारंपरिक सजावटीने होईल. त्यानंतर पुजार्ऱ्यांच्या मंत्रोच्चारात आणि वेदघोषात श्री देवगिरेश्वर महाराजांची पूजा, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी अत्यंत भक्तिभावाने पार पडतील. या सोहळ्यासाठी लांबवरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दुपारी १२.३० ते ३ या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
दिवसभर चालणाऱ्या धार्मिक विधींनंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. रात्री ८ ते ९ या वेळेत स्थानिक कलाकार आणि भजन मंडळांचे सुश्राव्य भजन होईल. त्यानंतर रात्री ९ ते १० या वेळेत अणसुरे येथील दुर्गामाता प्रतिष्ठानचे दणदणीत ढोलवादन होणार असून, या वाद्यांच्या गजरात संपूर्ण आसमंत दुमदुमून जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रात्री १० ते १२ या वेळेत फुलोरा, जानशी प्रस्तुत ‘फुर्वझ’ हे दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. प्रसाद पंगेरकर लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाद्वारे स्थानिक कलाकारांच्या अभिनयाची चुणूक रसिकांना पाहायला मिळेल.
यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आणि परमोच्च बिंदू असलेली श्रींची पालखी मिरवणूक मध्यरात्री १२.३० वाजता निघणार आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘श्री देवगिरेश्वर महाराजांचा विजय असो’च्या जयघोषात ही मिरवणूक मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. या पवित्र सोहळ्याचा, महाप्रसादाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविकांनी सहकुटुंब घ्यावा, असे आवाहन श्री देवगिरेश्वर देवालय ट्रस्ट आणि अणसुरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.







