GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात अल्पवयीन दुचाकीस्वारांची वाढती बेशिस्त; ५ हजार दंड भरूनही पालकांना जाग नाही

Gramin Varta
246 Views

राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर शहरात अल्पवयीन दुचाकीस्वारांनी माजवलेल्या बेशिस्तीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पोलीस कारवाई आणि दंड वसूल करूनही अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्यांच्या पालकांची मुजोरी सुरूच असल्याने पालकांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.

राजापूर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे २० ते २५ अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे. मात्र, कारवाईनंतरही हे प्रमाण कमी झालेले नाही. शहरातील शाळा-महाविद्यालये आणि अन्य भागांत अल्पवयीन दुचाकीस्वारांनी उच्छांद मांडला आहे. रानतळे येथील इंग्रजी माध्यम प्रशाळेत तर अल्पवयीन दुचाकी घेऊन जाणाऱ्या मुलांची संख्या ५० ते ६० इतकी आहे. शाळा प्रशासनाचे सांगणेही हे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही ऐकत नाहीत.

कारवाई होऊनही ही अल्पवयीन मुले राजरोसपणे शहरात दुचाकी फिरवत आहेत. काही जण तीन-तीन सीट घेऊन फिरत आहेत. अशा प्रकारे अल्पवयीन दुचाकीस्वारांची मुजोरी सुरूच असून, पालकही त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा प्रकारे या अल्पवयीन मुलांना पालक गाड्या देतातच कशा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या बेशिस्तीला आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने केवळ दंडात्मक कारवाई न करता, आता पालक व पाल्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

Total Visitor Counter

3376183
Share This Article