खेड: कौटुंबिक वादातून झालेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्या चुलत सासर्यावर सुऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील बहीरवली भोईवाडी येथे घडली आहे. २७ मार्च रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली असून, या हल्ल्यात ६३ वर्षीय चंद्रकांत धोंडू जाधव हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी खेड पोलिसांनी आरोपी सचिन सत्यवान जुवळे (वय ३३, रा. कोतवाली भोईवाडी) याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत जाधव यांचा मोठा भाऊ भागोजी जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी सचिन जुवळे याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आपल्याविरुद्ध पोलीस तक्रार का केली, याचा तीव्र राग सचिनच्या मनात होता. याच रागातून २७ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजता सचिन मोटारसायकलवरून फिर्यादी यांच्या घराबाहेर आला. त्याने घराबाहेर येऊन फिर्यादी चंद्रकांत जाधव आणि त्यांचा भाऊ भागोजी जाधव यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली.
वादाचे स्वरूप वाढत गेल्यानंतर सचिनने स्वतःसोबत आणलेल्या लोखंडी सुऱ्याने चंद्रकांत जाधव यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार केला. या हल्ल्यात जाधव यांना गंभीर दुखापत झाली असून, हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर जखमी चंद्रकांत जाधव यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सचिन जुवळे याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
खेड: पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून साऱ्यावर जावयाकडून सुऱ्याने हल्ला







