राजापूर: तेरवणमध्ये ‘रामलिंग’ एकाश्म लेणीचा शोध

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

वाकाटककालीन वारशाची शक्यता, संशोधनातून उलगडणार इतिहास

राजापूर : कोकणातील इतिहासाच्या दालनात नवे पान जोडणारी महत्त्वपूर्ण नोंद राजापूर तालुक्यातील तेरवण येथे झाली आहे. येथील निसर्गरम्य परिसरात एकाच खडकातून कोरलेली वैशिष्ट्यपूर्ण एकाश्म लेणी आढळून आली असून, तिची रचना सध्या पुरातत्व अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘रामलिंग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लेणीमध्ये दोन गर्भगृहे असून ती आतून परस्परांना जोडलेली आहेत, ही या लेणीची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब मानली जात आहे. यातील एका गर्भगृहात अधिष्ठान कोरलेले असून दुसरे गर्भगृह रिक्त आहे, तर लेणीसमोर बांधीव तळे आणि परिसरात देवकोष्टेही आढळतात. या सर्व घटकांमुळे ही रचना केवळ धार्मिकच नव्हे, तर स्थापत्यदृष्ट्याही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

विशेष म्हणजे, या लेणीची रचना विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील लेण्यांशी कमालीचे साधर्म्य दर्शवत असल्याने, ही लेणी वाकाटककालीन असण्याची दाट शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. या ऐतिहासिक वारशाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे, संशोधक विनोद पवार आणि स्थानिक ग्रामस्थ प्रकाश जोग यांनी नुकतीच या ठिकाणाला भेट देऊन सखोल पाहणी केली. एकाच खडकात कोरलेली गर्भगृहे आणि तळ्याच्या रचनेचा अभ्यास करत त्यांनी प्राथमिक निरीक्षणे नोंदविली आहेत. या संशोधनासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करून सखोल पडताळणी केली जाणार आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून येथे नियमित पूजा केली जात असली तरी, या अमूल्य ठेव्याचे शासकीय पातळीवर जतन आणि संवर्धन व्हावे, अशी मागणी होत आहे. तेरवण येथील या लेणीचा शास्त्रीय अभ्यास झाल्यास कोकणच्या प्राचीन इतिहासातील अनेक अज्ञात पैलू जगासमोर येण्यास मदत होणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *