GRAMIN SEARCH BANNER

खेड: भरणे नाक्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; अपघात करून चालक फरार

Gramin Varta
78 Views

खेड:तालुक्यातील भरणे नाका परिसरात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला असून, रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. लोटे मालवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना नवभारत हायस्कूलसमोर घडली. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने मदतीसाठी न थांबता आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून वेगाने पलायन केले असून, पोलीस आता या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित फावरे हे मुंबई-गोवा महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका काळ्या रंगाच्या कारने त्यांना भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, फावरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. तत्काळ १०२ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमीला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक देणारी कार चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेली आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनावरून अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे लोटे मालवाडी परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3299739
Share This Article