GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त साठ रुग्णांना प्रथमोपचार पेटीचे वाटप आणि जनजागृती

चिपळूण: इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) वुमन डॉक्टर्स विंग महाराष्ट्र राज्य आणि कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणमध्ये जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सुमारे ६० रुग्णांची तपासणी करून त्यांना प्रथमोपचार पेटीचे (फर्स्ट एड किट) वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे रुग्णांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. एका रुग्णाने तर या सुंदर आयोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरेख बासरी वादन केले, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी मार्गदर्शन करताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या यंदाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. अंधश्रद्धांना थारा न देता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुराव्यांवर आधारित उपचारांकडे लक्ष देऊन निरोगी भविष्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी ‘आयएमए’चे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. रत्नाकर घाणेकर, डॉ. संध्या घाणेकर, डॉ. विजय रिळकर, डॉ. वर्षा रिळकर यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी दैनंदिन जीवनातील चांगल्या सवयी आणि आरोग्यासाठी आवश्यक टिप्स यावर विस्तृत माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात डॉ. चिन्मय जाधव, डॉ. अजय सानप आणि डॉ. गजानन अवघडे यांनी विशेष सेवा दिली. महिला डॉक्टर्स विंगच्या विशेष योगदानामुळे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आणि आरोग्य शिबिराचे सर्वच थरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3486461
Share This Article