लांजा: ठाणे येथून गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी आलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा येथे घडली आहे. ही घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी घडली असून, यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.
ओमप्रकाश दगडू शेडे (वय ६०, रा. लांजा, सनगरवाडी, सध्या रा. ४/२५ श्री दर्गा अपार्टमेंट, ठाणे, कोळसेवाडी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ओमप्रकाश शेडे हे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता ठाणे येथून लांजा येथील त्यांच्या गावी गणपती सणासाठी आले होते. रात्री गणपतीची आरती व जेवण झाल्यानंतर ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे प्रकाश सादिकले यांच्या घरी झोपण्यासाठी गेले.
१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. ही बाब समजताच त्यांचे नातेवाईक अनिकेत शेडे यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ नुसार, गुन्हा नोंद क्रमांक ४८/२०२५ अंतर्गत करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी उत्साहाने गावी आलेल्या ओमप्रकाश शेडे यांच्या आकस्मिक निधनाने शेडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.