GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी मिरकरवाडा येथे कारची काच फोडून १० लाखांची रोकड लंपास

Gramin Varta
278 Views

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी रोड परिसरात दिवसाढवळ्या एका मच्छिमार व्यावसायिकाच्या चारचाकी वाहनातून १० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना १ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.१५ ते १.०० वाजण्याच्या दरम्यान घडली. खलाश्यांना साप्ताहिक खर्च देण्यासाठी बँकेतून काढलेली ही मोठी रक्कम होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मबीन मोहंमद मुल्ला (वय ५०, व्यवसाय मच्छीमारी, रा. गोळप, ता. जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी मल्ला हे मोठे मच्छिमार व्यावसायिक असून, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या एकूण चार पर्सनेट बोटी आहेत. या बोटींवर अंदाजे १०० ते १२५ खलाशी काम करतात. या खलाश्यांच्या आठवड्याच्या खर्चासाठी देण्यासाठी फिर्यादी मल्ला यांनी बँकेतून मोठी रक्कम काढली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुल्ला यांनी फेडरल बँक, शिवाजी नगर, रत्नागिरी येथील त्यांच्या मुलीच्या खात्यातून चेकद्वारे रोख १० लाख रुपये काढले. ही सर्व रक्कम त्यांनी एका निळ्या रंगाच्या पिशवीत ठेवली. त्यानंतर त्यांनी ती पैशांची पिशवी त्यांच्या मालकीच्या एम.एच-०८-बीई-५७८६ या चारचाकी वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटखाली ठेवली.

दुपारी १२.१५ ते १.०० वाजण्याच्या सुमारास ते हे वाहन घेऊन मिरकरवाडा जेटी रोड येथे आले आणि तेथे गाडी पार्क करून काही कामानिमित्त जेटीवर गेले. थोड्या वेळाने ते परत गाडीजवळ आले असता, त्यांना एक धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यांच्या उभ्या असलेल्या चारचाकी गाडीची मागील डाव्या बाजूची काच अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी कठीण वस्तूने फोडलेली होती.

काच फोडून चोरट्याने गाडीत प्रवेश केला आणि सीटखाली ठेवलेली निळ्या रंगाची पैशांची पिशवी चोरून नेली. या पिशवीत खलाश्यांच्या खर्चासाठी ठेवलेली तब्बल १० लाख रुपयांची रोकड होती. दिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या धाडसी चोरीमुळे मच्छिमार आणि व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर फिर्यादी मुल्ला यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून त्याच दिवशी रात्री ७.५३ वाजता अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कायदा कलम ३०३(२) नुसार गुन्हा क्रमांक ४४७/२०२५ नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, मिरकरवाडा परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3199407
Share This Article