GRAMIN SEARCH BANNER

मंत्री, संत्री हे कसले कोकणचे भाग्यविधाते, सतरा वर्षांपासून चौपदरीकरणाचा खेळखंडोबा

नारायण राणे, रामदास कदम, सुनील तटकरे, भास्कर जाधव, उदय सामंत यांच्यावर एस.एम. देशमुख यांची सडकून टीका

मुंबई / प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्ग पूर्वी होता तो बरा होता, पण आजची परिस्थिती पाहिली की ते दिवस आठवतात. कोणती अवदसा सुचली आणि चौपदरीकरणासाठी हट्ट धरला असे आता जनतेला वाटत आहे. चौपदरीकरणाच्या नावाखाली रस्ता फोडला गेला, आंदोलने झाली, कोर्टातही धाव घेतली… पण सतरा वर्षे उलटून गेली तरी रस्ता आजही अधांतरीच आहे. लोकांनी घेतलेले पैसेही संपले. मात्र रस्ता अजून पूर्ण होत नाही. याला कारणीभूत आहेत ते कोकणचे सगळे नेते. जनतेच्या भावनांशी खेळून नुसती आश्वासने देताहेत, अशी सडकून टीका मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांनी केली.

सध्या सोशल मीडियावर मुंबई गोवा महामार्गा वरील खड्ड्यांची भीषणता दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नेत्यावर टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले, नारायण राणे, रामदास कदम, सुनील तटकरे, भास्कर जाधव, उदय सामंत असे डझनभर ‘कोकणचे भाग्यविधाते’ आहेत. पण या सर्व नेत्यांना मिळूनही एक साधा रस्ता पूर्ण करता आलेला नाही. मग हे कसले भाग्यविधाते? ज्यांनी एवढ्या वर्षात कोकणच्या एका रस्त्यासाठी आवाज उठवला नाही. ठेकेदाराला धारेवर धरले नाही. नुसते दौरे करून सूचना दिल्या आहेत बातम्या छापून आणायच्या आणि आपली पाठ थोपटून घ्यायची. अशी ही सध्याची राजकारणी मंडळी आहेत.

चिपळूणजवळच्या रस्त्याची दुर्दशा दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रश्न फक्त चिपळूणपुरता मर्यादित नाही. रायगडचा असाच व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. तरीही काहीच बदल नाही. उलट कोकणातील लोक पत्रकारांनाच दोष देऊ लागले आहेत, “कशाला हा उद्योग केला, होता तो रस्ता बरा होता” अशी जनतेची बोचरी प्रतिक्रिया आहे. पत्रकारांनी प्रश्नावर आवाज उठवण्याच काम केलं मात्र कोकणच्या नेत्यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण गरजेचं होत. परंतु कोणत्याही नेत्याला ते जमलेल नाही.

उपाययोजना मात्र केवळ कागदावरच. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव आला की पाहणी दौरे, बैठकांचे फेरे, खड्डे बुजवण्याचे आदेश, कोट्यवधींच्या मंजुरी सगळं काही ठरल्याप्रमाणे होतं. पावसात खड्ड्यातली माती वाहून जाते आणि पुन्हा तोच तमाशा सुरू होतो. आश्वासनांची खैरात होते, पण प्रत्यक्षात काहीच बदल दिसून येत नाही.

उदय सामंतांनी तीन वर्षांपूर्वी दिलेलं आश्वासन अजूनही कानावर घुमतं,“पुढच्या गणपतीला खड्डे दिसणार नाहीत, चिपळूण साडेचार तासांत आणि सिंधुदुर्ग पाच तासांत गाठता येईल.” पण आजही वास्तव अगदी उलट आहे. आता काही दिवसापूर्वी ही त्यांनी हेच वाक्य उच्चारल पुढच्या गणपतीला रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत. आणखी किती वर्ष खोट बोलणार आणि लोकांची दिशाभूल करणार, कोकणातील जनता भोळी आहे. त्यांच्या याच भोळेपणाचा फायदा राजकारणी घेत आहेत.

या रस्त्यावरून आता लाखो चाकरमानी आणि भक्त प्रवास करणार आहेत. खड्डे, अपघात, मृत्यू याची जबाबदारी कुणीच घेणार नाही. जनतेच्या शिव्याशापांचा वर्षाव मात्र होणार हे नक्की.

आज कोकणचं खरं दुर्भाग्य म्हणजे, रस्त्याची अशी बिकट अवस्था असूनही कोणालाच लाज नाही, जबाबदारी नाही. जीव मुठीत घेऊन गणरायावर विश्वास ठेवूनच कोकणी माणूस घरी पोहोचणार.

गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा अशी आपण सर्व शुभेच्छा देऊ शकतो. पण या ‘भाग्यविधात्यां’मुळे वास्तव मात्र नेहमीच खड्ड्यातच राहतं.

Total Visitor Counter

2475387
Share This Article