सर्प मित्र सुकांत पाडाळकर यांचे 350 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळंबे प्रशालेमध्ये सोमवार, 28 जुलै 2025 रोजी नागपंचमीनिमित्त (29 जुलै 2025 रोजी) राष्ट्रीय हरित सेना विभागांतर्गत सर्प-जाणीव-जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे 350 विद्यार्थ्यांना सापांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सर्पमित्र श्री. सुकांत पाडळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. मुख्याध्यापक श्री. रवींद्र मुळ्ये यांनी सर्पमित्र श्री. पाडळकर यांचे, तर त्यांचे सहकारी श्री. किशोर रावण यांचे स्वागत संस्थेचे सदस्य श्री. प्रथमेश मुळ्ये यांनी केले.
सर्पमित्र श्री. सुकांत पाडळकर यांनी इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना चित्रांच्या माध्यमातून सापांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखावे, यावर त्यांनी भर दिला. सापांबद्दल समाजात असलेले गैरसमज त्यांनी दूर केले. साप का मारू नयेत आणि साप हा शेतकऱ्याचा मित्र कसा आहे, हे त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरित सेना विभाग प्रमुख श्री. खांबे सर यांनी केले, तर मान्यवरांचे आभार श्री. एस.एस. जोशी सर यांनी मानले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. कोळंबे व्यतिरिक्त वांद्री भागातील शाळेतही असेच मार्गदर्शन करण्यात आले.