संगमेश्वर तालुका असो अथवा ग्रामीण रत्नागिरी जिल्हा… अनेक भागातील अंतर्गत रस्ते खड्डेमय आहेत.अनेक जिल्हा मार्गांची अवस्था बिकट आहे. हा टीकेचा विषय नाही तर आजकालच्या तथाकथित विकासाच्या मुद्यांचा आहे.आपल्या मातीवर, जिल्ह्यावर प्रेम करणारा नागरिक म्हणून आपण यावर बोललं पाहिजे.
ग्रामीण भागात आजकाल छोटे मोठे नेते आणि काही प्रमाणात जनता विकासाच्या नावाने सत्तेच्या जवळ जाताना दिसतात. विरोधी विचारांच्या लोकांबरोबर काम करून विकास होत नाही अशी भावना सत्तेच्या जवळ जाणारे सांगतात.ज्या विकासासाठी आपण सत्तेजवळ जात आहोत त्यांना प्रश्न विचारून आपल्याच भागातील रस्ते दुरुस्त होणार नसतील तर मग प्रश्न पडतो…चाळण रस्त्यांची झाली आहे की दिखाव्याचे कपडे घालणाऱ्या ‘विकासाच्या’ कपड्यांची ?
एकीकडे रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुका पर्यटन विकासाभिमुख झाला पाहिजे यासाठी मोठ्या गोष्टी करायच्या… सरकारी कागद रंगवायचे…भाषणे ठोकायची. आणि दुसरीकडे पर्यटन विकास होण्यासाठी महत्वाचा असणारा रस्ते विकास मात्र सोयीस्कर विसरायचा?याला जिल्हा विकासाचे धोरण म्हणता येणार नाही.
संगमेश्वर तालुक्यातील अनेक जिल्हा मार्ग खड्डेमुक्तीसाठी टाहो फोडत आहेत.
त्या त्या भागातील नागरिकांच्या संवेदना हरवल्या आहेत म्हणून की काय आता खड्डेमय झालेले रस्ते स्वतः आंदोलन करतील की काय अशी त्या रस्त्यांची अवस्था आहे.देवरुख- साखरपा-संगमेश्वर रस्ता, देवरुख-मेघी-देवळे,वांझोळे-मोर्डे-कनकाडी रस्ता,कोसूंब-ताम्हाणे- वांद्री यासह अनेक रस्ते दुरुस्त व्हायला हवेत.या खराब रस्त्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यायला हवे.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात येतात.त्यांना उत्तम दर्जाचे खड्डेमुक्त रस्ते मिळाले तर हेच लोक उद्या कोकणच्या विकासाचे गोडवे बाहेर गाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या बाबी लक्षात येत नसतील तर असे प्रशासन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास काय करणार हाही प्रश्न आहे.
अनेकदा सरकार म्हणून चांगले निर्णय घेतले जातात.पण या निर्णयाची अंमलबजावणी नीट होणार नसेल तर कोकणात पर्यटन विकास होणार कसा?हे कोण आम्हाला समजावून सांगेल काय?
विकास हा गोंडस शब्द आहे. त्याचा हवा अर्थ लावण्यात राजकीय लोकं तरबेज आहेत… जनतेला या ‘विकासाचा’ अर्थ समजायला वेळ लागत आहे…आणि म्हणूनच विकासाच्या नावाने सत्तेच्या जवळ जाणाऱ्यांना स्वतःच्या नेहमीच्या रस्त्याला पडलेले खड्डे सुद्धा दिसत नाहीत.ही स्थिती अधिक चिंताजनक आहे. जेव्हा अशा स्थितीबाबत लोकांनाच काही पडलेले नाही अशी चर्चा सुरू होते तेव्हा खड्ड्यांमुळे त्या रस्त्यांची चाळण झाली आहे असं म्हणण्या पेक्षा तथाकथित ‘विकासाच्या’कपड्यांचीच चाळण झाली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही… ठिगळ कुठं कुठं लावायचं इतकाच प्रश्न आहे.
– सुहास खंडागळे
(लेखक गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख)
चाळण रस्त्यांची की ‘विकासाच्या’ कपड्यांची ? – सुहास खंडागळे
