रेकॉर्डवरील गुन्हेगार
लांजा : पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीदरम्यान एका संशयित व्यक्तीला चोरीच्या उद्देशाने फिरताना रंगेहाथ पकडण्यात आले. कुवे येथील गणपती मंदिराच्या आवारात ही घटना घडली असून, पकडलेला आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील जुना गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुयोग रोहिदास वाडकर हे गस्त घालत होते. यावेळी त्यांना कुवे येथील गणपती मंदिर परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. वाडकर यांनी तात्काळ त्याला थांबवून विचारणा केली. तो सूर्योदयापूर्वी चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव रामचंद्र पुणाजी मसणे (वय ५२, रा. पन्हळे मसणेवाडी, ता. लांजा) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता, तो यापूर्वीच पोलीस दप्तरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर यांनी रामचंद्र मसणे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे परिसरातील मोठी चोरी टळल्याची चर्चा सुरू आहे.
या घटनेमुळे लांजा पोलीस ठाण्याकडून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
लांजात रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरणारा चोरटा ताब्यात
