GRAMIN SEARCH BANNER

पाटपन्हाळे येथे खताच्या गोदामात आढळला अजगर; सर्पमित्रांकडून जीवदान

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामात खताच्या गोणींमध्ये एक महाकाय अजगर आढळून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. गोणींमध्ये वेटोळे घालून बसलेल्या या अजगराला शृंगारतळी येथील सर्पमित्राने पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिले.

पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीचे हे गोदाम शृंगारतळी येथील अर्बुदा स्टील सेंटरसमोर आहे. सध्या या गोदामात खताच्या गोणी ठेवल्या आहेत. या खताचे वितरण करण्यासाठी कर्मचारी विनायक जोशी, सचिन कदम आणि प्रमोद चव्हाण हे गोदामातील गोणी बाहेर काढण्यासाठी गेले होते. गोणी बाजूला करत असताना त्यांना सुमारे सहा फुटांचा एक अजगर वेटोळे घालून बसलेला दिसला.

अजगराला पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ शृंगारतळी येथील सर्पमित्र अरमान मुजावर यांना बोलावले. मुजावर यांनी कोणत्याही भीतीशिवाय, अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या अजगराला पकडले. त्यानंतर त्यांनी या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच जंगलात नेऊन मुक्त केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्पमित्र मुजावर यांच्या तत्परतेमुळे अजगराचा जीव वाचला आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Total Visitor

0218131
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *