GRAMIN SEARCH BANNER

पुस्तक,गणवेश आणि खाऊ देऊन पालकमंत्र्यांकडून झरेवाडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हा परिषद शाळेत मूल शिकतेय याचा गर्व असावा – पालकमंत्री डाॕ उदय सामंत

रत्नागिरी – शिक्षणाच्यादृष्टीने राज्याने प्रगती केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत माझ्यासारख्या अनेकांनी शिकून जीवनात विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतेय, याचा गर्व पालकांना असला पाहिजे, असे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी सांगितले.

झरेवाडी येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत उपक्रमात पालकमंत्री डाॕ सामंत यांनी पुस्तके, गणवेश आणि खाऊ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यदाव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी कासार, राजेश कळंबटे, महेश म्हाप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कोठेही झाले नसेल, असे स्वागत महाराष्ट्रात होत आहे, त्याबद्दल शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना धन्यवाद देतो. या शाळेतील शिक्षक पालकांसारखी काळजी घेतील म्हणूनच तुमच्याकडे विद्यार्थी न रडता प्रवेश घेत आहेत.  भविष्यात अभ्यासात मुले रडणार नाहीत, याची काळजीही शिक्षकांनी घ्यावी. जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षेतून इस्त्रो आणि नासाला जाण्यासाठी निवड करुन पाठवणारा रत्नागिरी पहिला जिल्हा आहे. 99 टक्के शिक्षक ज्ञान देण्याचं काम करत आहेत, हे भूषणावह आहे. शिक्षकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यांचा आदर असला पाहिजे. शिक्षकांनीही प्रमाणिकपणे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे काम केले पाहिजे.

पुस्तकातले ज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने माझी मुलं कशी संपादन करतील, यासाठी शिक्षकांनी आता मेहनत घेतली पाहिजे. असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, शिक्षकांनी जर चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर मराठी शाळेतला विद्यार्थी उत्तम इंग्रजी बोलू शकतो, अशी उदाहरणे महाराष्ट्राच्या स्तरावर आपण बघितलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मराठी भाषा होती. ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी भाषा होती. आपली मातृभाषा मराठी आहे. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. परंतु, जगाच्या पाठीवर इंग्रजी यायला हवी, त्यासाठी शिक्षकांनी अभिनव उपक्रम सुरु करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2455441
Share This Article