चिपळूण : तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या थकीत कमिशनसंदर्भात दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनानुसार थकीत कमिशनपैकी अर्धा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत तीन महिन्यांचे थकीत कमिशन दुकानदारांच्या खात्यात जमा होणार आहे. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षांपासून रेशन दुकानदार विविध अडचणींना सामोरे जात असतानाही शासनाने निर्धारित केलेले धान्य योग्य पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. काळाबाजार थांबवण्यासाठी शासनाने अनेक तंत्रज्ञानाधारित उपाय योजना राबवल्या आहेत. अशा परिस्थितीत दुकानदार कोणतीही तक्रार न करता आपले कर्तव्य पार पाडत असले तरी त्यांना वेळेवर कमिशन मिळत नाही. त्यामुळे अनेक दुकानदार आर्थिक संकटात सापडले असून उपासमारीची वेळ ओढवली आहे.
ही बाब संघटनेच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यानुसार आमदार निकम यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन रेशन दुकानदारांच्या समस्या मांडल्या. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, खजिनदार रमेश राणे यांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना दिले. त्यामध्ये थकीत कमिशन त्वरित मिळावे, २०१४ पासून लागू असलेल्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार महागाईप्रमाणे कमिशन वाढवावी, २०१३ ते २०१८ या काळातील धान्य वाहतुकीची फरक रक्कम मिळावी, आधार सिडींग, मोबाईल फीडिंग, ई-केवायसी, ई-श्रमयादी, दिव्यांग लाभार्थी शोधणे अशा अतिरिक्त कामांचा मोबदला द्यावा, तसेच धान्य विक्रीवरील कमी कमीशन वाढवावे, राज्यातील सर्व्हर व नेटवर्कमधील अडचणी दूर कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
मंत्री भुजबळ यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सध्या थकीत कमिशनपैकी अर्धा निधी जिल्हा पुरवठा विभागाकडे जमा करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम आणि खजिनदार रमेश राणे यांच्याशी झालेल्या भेटीत दिली. येत्या चार दिवसांत तीन महिन्यांचे कमिशन वितरित केले जाणार असून उर्वरित निधी प्राप्त होताच उरलेली रक्कमही वितरित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूण : रेशन दुकानदारांच्या थकीत कमिशनसाठी अर्धा निधी प्राप्त; उर्वरित रक्कम लवकरच मिळणार
