GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डेच्या विद्यार्थ्यांचे  राष्ट्रीय पातळीवर यश

Gramin Varta
371 Views

सौरभ साठे यास सुवर्णपदक तर  सिद्धार्थ भोवडला रोख पारितोषिक
        
संगमेश्वर :  कलावर्तन्यास उजैन, मध्यप्रदेश यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रस्पर्धेचे हे २७ वे वर्ष असून, देशभरातील विविध राज्यांतून स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.या स्पर्धेत सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला आहे. सदर स्पर्धेत सौरभ साठे यास उत्कृष्ट कलाकृतीसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले, तर सिद्धार्थ भोवड यास प्रभावी सर्जनशीलतेबद्दल रोख रकमेचे पारितोषिक मिळाले आहे.या स्पर्धेमधून निवड होणे त्या विद्यार्थ्यांसाठी व कलामहाविद्यालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे कलामहाविद्यालयाचे व सह्याद्री शिक्षण संस्थेचे नाव उंचावले आहे.

सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालय दरवर्षी विविध राज्य आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत भाग घेत असते. दरवर्षी या कला महाविद्यालयातील विद्यार्थी अशा स्पर्धांमधून उल्लेखनीय यश मिळवत असतात. याबरोबरच राज्य कला प्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटी कला प्रदर्शन अशा प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड होत असते. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, कलाकृती साकारताना त्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य, कला विद्यार्थ्यांची स्वतःची स्वतंत्र कलाशैली यामुळेच आमच्या कला महाविद्यालयातील विद्यार्थी स्वतःची स्वतंत्र ओळख प्राप्त करून असल्याचे कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी सांगितले.

सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाचा विस्तीर्ण परिसर, येथील समृद्ध शिल्पकलेचे दालन, कला विद्यार्थ्यांना केले जाणारे सखोल मार्गदर्शन, प्रसिद्ध कलाकारांच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन , कलाविषयक विविध कार्यशाळा , कला महाविद्यालयाचे वार्षिक कला प्रदर्शन , पावसाळी अभ्यास सहली आणि दररोज विद्यार्थ्यांकडून करून घेतला जाणारा सराव यामुळे आमच्या कला महाविद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी मोठ्या मेहनतीने विविध स्पर्धांमधून यश खेचून आणतात असे कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी अभिमानाने नमूद केले.
   
विद्यार्थी देखील आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास देत आहेत. पारितोषिक प्राप्त व्हावे याच दृष्टीने आम्ही काम केले होते असे नव्हे तर, आमच्या हातून साकारणारे प्रत्येक काम हे दर्जेदारच असावे असे आमचे प्रयत्न असल्यानेच आम्हाला या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळाल्याचे सौरभ साठे आणि सिद्धार्थ भोवड याने सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम,अनिरुद्ध निकम कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि  अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

2648142
Share This Article