स्वतःच्या पाण्याच्यातून टाकीतून दिले पाणी, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
मकरंद सुर्वे / संगमेश्वर : वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राला गेल्या दोन महिन्यांपासून गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. बोअरवेलचा पंप बंद पडल्याने केंद्रातील कर्मचारी तसेच क्वार्टर्समध्ये राहणारे कुटुंबीय हे पावसाचे पाणी साठवून त्यावरच जगत होते. अगदी पिण्यासाठीही पावसाचे पाणी गाळून वापरण्याची वेळ आरोग्य केंद्रावर आली होती.
या समस्येबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार लेखी दाद मागूनही काहीच तोडगा निघाला नव्हता. एवढेच नव्हे, तर कोणीही प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात येऊन परिस्थिती जाणून घेण्याची तसदीही घेतली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही रुग्णसेवेबाबत अनास्था दाखविल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.
अखेरीस आरोग्य केंद्रातील स्टाफ नर्स सुर्वे मॅडम यांनी ड्युटीवर रुजू होण्यापूर्वीच आपली व्यथा ग्रामपंचायत सरपंच सौ. अनिषा नागवेकर यांच्यापर्यंत पोचवली. तात्काळ प्रतिसाद देत माजी सरपंच नागवेकर यांनी केवळ सहा तासांत 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली. याशिवाय आपल्या स्वतंत्र पाईपलाईनमधून पाणी कनेक्शन देऊन पुढील काही महिन्यांसाठी पाण्याची समस्या मिटवली.
या उपक्रमात त्यांचे पती ॲड. अरुण नागवेकर आणि सामाजिक कार्यकर्ते अमर मोहिते यांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचा पाणीपुरवठा पुढील चार महिने नियमित सुरू राहणार आहे.
या तातडीच्या आणि प्रभावी कार्यवाहीमुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच रुग्ण व ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.