दापोली : ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील तरुणाला १ कोटी १० लाख ८० हजार रुपयांचा चरससह अटक केली आहे. मसुद बदुद्दीन ऐनरकर (वय २९, रा. अपनानगर, खोंडा, दापोली) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो १०६ ग्रॅम चरस आणि अन्य साहित्य जप्त केले.
पोलिस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाण्यातील शिळफाटा परिसरात हावरे सिटीसमोर सापळा रचण्यात आला. मसुद ऐनरकर रत्नागिरीहून चरस घेऊन ठाण्याकडे येत असताना पोलिसांनी त्याला पकडले. तपासात विक्रीसाठी ठेवलेला चरस आढळून आला.
चरस सहसा विदेशातून भारतात येतो. त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेट असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने चरस कुठून आणला आणि कोणाला पुरविणार होता, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(प)(क) अंतर्गत शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक पुढील तपास करत असून आरोपीचा मोठ्या रॅकेटशी संबंध आहे का याची चौकशी सुरू आहे.
ठाण्यात १.१० कोटींचा चरस जप्त; दापोलीचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
