GRAMIN SEARCH BANNER

जाकादेवी बाजारपेठेत मटका जुगारावर पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
152 Views

रत्नागिरी: रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खालगाव जाकादेवी बाजारपेठ परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवार, २४ जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास जाकादेवी बाजारपेठेतील एका टपरीच्या आडोशाला हा छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाकादेवी बाजारपेठेत एक इसम कल्याण मटका जुगार खेळवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवाल्दार बाजीराव नारायण कदम आणि त्यांच्या पथकाने सकाळी ८:५० च्या सुमारास संबंधित ठिकाणी सापळा रचला. येथील एका टपरीच्या आडोशाला संशयित आरोपी संतोष दाजी धामणे (वय ५३, रा. खालगाव जाकादेवी भटवाडी) हा बेकायदेशीरपणे आणि कोणताही परवाना नसताना मटका जुगार खेळवण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगून असताना मिळून आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून ५२० रुपयांची रोख रक्कम आणि मटका जुगाराचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस हवाल्दार बाजीराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संतोष धामणे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रामीण भागात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून अशा प्रकारच्या जुगार अड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3199334
Share This Article