GRAMIN SEARCH BANNER

रायगडची कन्या रोशनी पारधी राज्याच्या वरिष्ठ क्रिकेट संघात दाखल

Gramin Varta
128 Views

रायगड: जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात आज एक सुवर्णक्षण कोरला गेला आहे. महाड तालुक्यातील रोशनी रविंद्र पारधी हिने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात स्थान मिळवून जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

केवळ १६ वर्षांची रोशनी ही रायगडमधून वरिष्ठ गटात पोहोचणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली असून, तिच्या या ऐतिहासिक कामगिरीने संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.

रोशनी ही रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) आणि महाडमधील एसबीसी क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षित होत आहे. तिचा अष्टपैलू खेळ – फलंदाज म्हणून आक्रमकता, जलदगती गोलंदाज म्हणून भेदकता आणि क्षेत्ररक्षणात चपळता – यामुळे ती सातत्याने चमकत आहे.

मागील वर्षी आंतरजिल्हा १५ वर्षांखालील स्पर्धेत रोशनीने सलग तीन शतके ठोकून राज्यस्तरावर आपले नाव अधोरेखित केले. तिची ही सातत्यपूर्ण कामगिरी आणि मैदानावरील प्रगल्भता लक्षात घेऊनच वरिष्ठ संघात तिची निवड करण्यात आली.

प्रशिक्षक आवेश चिचकर यांनी तिच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “रोशनीने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केले आहे. तिच्या मेहनतीला आणि समर्पणाला ही निवड म्हणजे सन्मान आहे.” रोशनीच्या यशाबद्दल तिचे वडील रवींद्र पारधी यांनीही आनंद व्यक्त केला.

एसबीसी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष बशीर चिचकर यांनी तिला भविष्यात भारतीय संघात पाहण्याची आशा व्यक्त केली. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी रोशनीचे, तिच्या प्रशिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत, हे यश संपूर्ण जिल्ह्याच्या मेहनतीचे फल असल्याचे सांगितले.

या ऐतिहासिक निवडीमुळे रायगडमधील अनेक होतकरू मुलींना प्रेरणा मिळणार असून, महिला क्रिकेटसाठी हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. रोशनी पारधीने रायगडच्या कन्यांचा आवाज आता मैदानावरही दुमदुमू शकतो, हे सिद्ध करून दाखवले आहे.

Total Visitor Counter

2652421
Share This Article