GRAMIN SEARCH BANNER

दाभोळे पुलाजवळ भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली दुचाकी अडकली

Gramin Varta
655 Views

रमेश शिंदे / भडकंबा : रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडला असून दाभोळे पुलाजवळ डंपरने निष्काळजीपणे रिव्हर्स घेतल्याने दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात दुचाकी पूर्णतः चाकाखाली गेली असतानाही स्वाराने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. त्यामुळे ‘नशीब बलवत्तर’ म्हणूनच मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाभोळे गावातील रहिवासी अवधूत हरिचंद्र बेलकर हे मंगळवारी पहाटे आपल्या (MH-08-BA-5167) क्रमांकाच्या दुचाकीवरून कामानिमित्त जात होते. दाभोळे पुलाजवळ ते पोहोचताच (MH-08-1589) क्रमांकाच्या डंपरचा चालक बेनी नवलसिंह भुमिया (रा. मध्य प्रदेश) याने आपले वाहन अचानक आणि निष्काळजीपणे पाठीमागे घेतले. यावेळी डंपरने थेट दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकी क्षणार्धात डंपरच्या चाकाखाली गेली. समोर मृत्यू उभा ठाकल्याची जाणीव होताच अवधूत बेलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुचाकीवरून उडी मारली. त्यांच्या या चपळाईमुळे ते थोडक्यात बचावले, मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणी देवरुख पोलिसांनी संबंधित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे

Total Visitor Counter

3376545
Share This Article