चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका ६८ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तींनी हातपाय बांधून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने चिपळूण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खून झालेल्या महिलेचे नाव वर्षा जोशी (वय ६८) असे असून त्या एकट्याच घरात राहत होत्या. सकाळी काही शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता त्यांना तिचा मृतदेह सापडला. हातपाय घट्ट बांधलेले होते आणि शरीरावर गंभीर जखमांचे निशाण होते. खून करण्यापूर्वी महिलेने प्रतिकार केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र प्रत्यक्षात हत्या कुणी आणि का केली? यामागे आणखी कोणते धागेदोरे आहेत का? हे अजून स्पष्ट झालेले नाही.पोलीस तपासाच्या सुत्रांनुसार काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, या खुनामागचे गुंतागुंतीचे रहस्य उलगडण्यासाठी तपास अधिक वेगात सुरू आहे.