गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी धावत दिला फिटनेसचा संदेश; दोन हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग
खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘वर्षा मॅरेथॉन – पर्व २ (Run For Health) २०२६’ ही स्पर्धा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे उद्घाटनानंतर त्यांनी स्वतः धावत मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत उपस्थित धावपटूंना प्रोत्साहन दिले. या उपक्रमातून आरोग्य, फिटनेस आणि नियमित व्यायामाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
खेड शहरात आयोजित या मॅरेथॉनमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक धावपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही स्पर्धेत सहभागी होत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थित धावपटूंशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नियमित व्यायाम, संतुलित जीवनशैली आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी वेळ काढणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले, “लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने सलग दुसऱ्या वर्षी वर्षा मॅरेथॉनचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. गेल्या वर्षीही मी या स्पर्धेत सहभागी झालो होतो. मी स्वतः फिटनेस आणि नियमित व्यायामावर विश्वास ठेवतो. अशा मॅरेथॉनमधून वेगळी ऊर्जा मिळते. सर्वांत आनंदाची बाब म्हणजे शहरासोबतच ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने युवक-युवती या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वयाची कोणतीही मर्यादा नसल्याचे या स्पर्धेत पाहायला मिळाले. तब्बल ७२ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक धावताना दिसले, तर पाच ते सात वर्षांची चिमुकली मुलेही उत्साहाने सहभागी झाली होती. यामधून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि कायम तंदुरुस्त राहण्याचा संदेश मिळतो. गेल्या वर्षभरात मी स्वतः सुमारे ४ ते ५ किलो वजन कमी केले असून आठवड्यातून किमान तीन दिवस व्यायामासाठी वेळ काढतो.”
स्पर्धेच्या निमित्ताने आरोग्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये व्यायामाची सवय रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व वयोगटातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘रन फॉर हेल्थ’ या संकल्पनेला साजेसा ठरला.
या कार्यक्रमाला उद्योजक बशीर भाई हजवानी, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक शमशुद्दीन भाई मुकादम, भाजपचे वैभव खेडेकर, नगराध्यक्षा सौ. माधवीताई बुटाला, नगरसेविका सौ. वैभवीताई खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, सभापती सौ. आफिया पालेकर, विविध नगरसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, क्लबचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यशस्वी आयोजन, विक्रमी सहभाग आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश यामुळे ‘वर्षा मॅरेथॉन – पर्व २’ ही स्पर्धा खेड शहरातील एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम ठरली.





