रत्नागिरी: येथील रामरोडवरील भगवती नगर परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने तत्परतेने आणि सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुमारे दीड तासाच्या बचावकार्यानंतर हा बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. या बचावकार्यात वनविभागासह पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
आज, दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास, मौजे भगवती नगर येथील रहिवासी श्री. भूषण जयसिंग घाग यांना त्यांच्या घरामागील विहिरीत एक वन्यजीव पडल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली. माहिती मिळताच, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांनी तात्काळ पिंजरा आणि बचाव साहित्यासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर, बचाव पथकाला घराच्या मागील बाजूस १०० फूट अंतरावर असलेल्या एका विहिरीत बिबट्या अडकलेला दिसला. विहिरीची खोली ४० फूट असून, पाण्याची पातळी ५ फुटांवर होती. बिबट्या पाण्याच्या पृष्ठभागावर असलेल्या मोटर पाईप आणि दोरीला धरून बचावण्याचा प्रयत्न करत होता. त्याची स्थिती पाहून, पथकाने वेळ न घालवता बचावकार्य सुरू केले.
बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथकाने विहिरीवर जाळे टाकून विशेष पिंजरा दोऱ्यांच्या साहाय्याने विहिरीत उतरवला. अत्यंत कुशलतेने करण्यात आलेल्या या बचावकार्यामुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या आत बिबट्या स्वतःहून पिंजऱ्यात बंद झाला आणि त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
यानंतर, मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत हा बिबट्या मादी जातीचा असून, त्याचे वय अंदाजे १० ते १२ महिने असल्याचे निष्पन्न झाले. बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यावर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य पार पडले. या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक विराज संसारे, श्रीमती शर्वरी कदम आणि किरण पाचारणे यांनी विशेष परिश्रम घेतले. याव्यतिरिक्त, पोलीस अधिकारी ए. व्ही. गुरव, आर. एस. घोरपडे, ए. ए. अंकार, एन. एस. गुरव, सरपंच सौ. श्रेया राजवाडकर, पोलीस पाटील श्री. सुरज भुते, तसेच वन्यजीव मित्र महेश धोत्रे, ऋषिराज जोशी, रोहित खेडेकर, आदर्श मयेकर आणि स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वनविभागाने या यशस्वी बचावकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. अशा प्रकारची घटना घडल्यास किंवा कोणत्याही वन्यप्राण्याला मदत लागल्यास वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.