GRAMIN SEARCH BANNER

केंद्रीय सहकारिता मंत्रालय स्थापना सप्ताह अंतर्गत सहकारी संस्थांचे कार्यशाळेचे आयोजन

Gramin Search
11 Views

रत्नागिरी : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक लि. आणि रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने जिल्ह्यातील सहकारी संस्थांची कार्यशाळा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात आज झाली. काश्मीर ते कन्याकुमारी देशभरात सहकार चळवळ बांधण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारिता मंत्रालयाची स्थापना केली. सहकार पुरस्कारसाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त नामांकन १८ जुलैपर्यंत दाखल व्हावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.

जिल्हा उपनिबंधक श्री. शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा यावर मार्गदर्शन केले. विकास संस्था, फेडरेशन ग्रुप यांच्या समुहावर सर्व निकष, विविध माहिती दिली जात असते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त गावातून सहकार पुरस्कारसाठी नामांकन यावेत, अशी अपेक्षा आहे. १८ जुलै पर्यंत ही नामांकनं येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. देशभरात सहकार चळवळ बांधण्यासाठी ६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय सहकारिता विभाग स्थापन झाला. केंद्रीय सहकार मंत्री श्री. शहा यांनी ही चळवळ काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत बांधण्यासाठी पुढाकार घेतला.  गुजरात राज्य सहकारी बँकेने आणि तेथील मध्यवर्ती बँकेमार्फत त्यांनी केलेल्या कार्याबाबत माझ्या अभ्यास दौऱ्याचा दीडशे पानाचा अहवाल शासनाला सादर केला असल्याचेही ते म्हणाले.

आदर्श लेखा परिक्षण या विषयावर जिल्हा विशेष लेखा परिक्षक विनोद अंडुस्कर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शासनाच्या सहकार विभागाकडून वेळोवेळी शासन निर्णय परिपत्रके दिली जात असतात. या सर्वांच्या माध्यमातून सर्वांनी कामकाज करावे.

आदर्श संचालक मंडळ सभा विषयावर स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उत्तम पध्दतीने आपापली संस्था मार्गस्थ व्हावीत. व्यवहार स्वच्छ रहावेत. ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली, तो सफल व्हावा, यासाठी संचालक मंडळांची सभा ही महत्त्वाची असते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. ग्राहक एसआयपी, एसडब्लूपी अशा नव्या गोष्टींकडे वळत आहेत. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या माध्यमातून संगणकामध्ये सुधारणा आली आहे. आधुनिक सेवा प्रदान करताना त्वरित निर्णय घेण्याची क्षमता कृत्रिम बुध्दीमत्तेमध्ये आहे.

शासकीय लेखा परिक्षक महेश जाधव यांनी आदर्श लेखा परिक्षण,  सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण आणि कोमसापचे गजानन पाटील उपस्थित होते.

सहकार सोपान क्युआर कोड ग्रंथालय या पोस्टर्सचे वाटप जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते उपस्थित संस्थांना करण्यात आले. विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Total Visitor Counter

2648186
Share This Article