रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चोरट्यांनी पुन्हा एकदा शहरात धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) सकाळी अभ्युद्यनगर येथील एका दुमजली बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातून ५० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
अभ्युद्यनगर येथील सायली अनिल झगडे यांच्या मालकीचे हे दुमजली घर आहे. ९ ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास हे घर बंद असल्याचे पाहून, मुख्य दरवाजाला फक्त ‘लॅच लॉक’ असल्यामुळे घर रिकामे असावे, असा कयास चोरट्यांनी लावला. त्यानंतर चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक उचकटून आत प्रवेश केला. खालच्या मजल्यावरील कपाटे उचकटून त्यातील रोख रक्कम मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी कपाटातून ५० हजार रुपयांची रोकड काढून घेतली.
दरम्यान, या वेळी घराच्या वरच्या मजल्यावर घरातील महिला झोपलेल्या होत्या. घरात कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यामुळे त्या जागी झाल्या. त्यांनी लाईट लावून खाली येण्याचा प्रयत्न केला. घरात कुणीतरी असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी लगेच तिथून पळ काढला. मात्र, पळण्यापूर्वी चोरट्यांनी कपाटातून काढलेली ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.