रत्नागिरी : आठवडा बाजार येथील कोहिनूर फर्निचर दुकानासमोर काल (२८ जून) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास, कपडे विक्रेत्याला तीन अज्ञात व्यक्तींनी किरकोळ वादातून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत दुकानदाराला गंभीर दुखापत झाली असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद शंकर पावसकर (वय ३४, रा. रेन मार्केट, रत्नागिरी), मंदार महादेव वडपकर (वय ३५, रा. रेन मार्केट, रत्नागिरी) आणि दिनेश जगन्नाथ वरवडकर (रा. पावस बाजारपेठ, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजेश कुमार विश्वनाथ प्रसाद (वय ५०, व्यवसाय कपडे विक्रेता, रा. झारणी रोड मच्छी मार्केट, रत्नागिरी) हे आठवडा बाजारात रस्त्याच्या बाजूला महिलांचे कपडे, कटलरी आणि पायपुसणी यांची विक्री करत होते. त्यावेळी प्रल्हाद शंकर पावसकर, मंदार महादेव वडपकर आणि दिनेश जगन्नाथ वरवडकर या तिघांनी पायपुसणीची किंमत विचारली.
ब्रिजेश कुमार यांनी ‘१०० रुपयांना दोन पायपुसणी’ असे सांगितले असता, आरोपींनी ‘१०० रुपयांना तीन पायपुसणी द्या’ अशी मागणी केली. यावर ब्रिजेश कुमार यांनी तसे देता येणार नाही असे सांगितल्यावर आरोपींना राग आला. त्यांनी ब्रिजेश कुमार यांची कॉलर पकडून, त्यांना धक्काबुक्की करत खाली पाडले आणि शिवीगाळ केली. तसेच, त्यांच्या कपड्यांचे दुकान हाताने विस्कटून नुकसान केले.
याचवेळी, आरोपींपैकी एकाने फिर्यादींच्या शेजारील सजिदा पठाण यांच्या स्टॉलमधील लोखंडी स्टूल हातात घेऊन ब्रिजेश कुमार यांच्या डोक्यात आणि डाव्या बाजूच्या कमरेवर मारून त्यांना गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी ब्रिजेश कुमार विश्वनाथ प्रसाद यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भारतीय दंड संहिता कायदा २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३२४(४), ३२४(५) प्रमाणे २८१/२०२५ असा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
रत्नागिरीच्या आठवडा बाजारात कपडे विक्रेत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Comment