GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात दिवसाढवळ्या धाडसी चोरी; १३ लाखांचा ऐवज लंपास

Gramin Search
9 Views

राजापूर: राजापूर शहरात आषाढी एकादशी आणि मोहरममुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही, चोरट्यांनी आपली हिंमत दाखवत दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या केल्या आहेत. यापैकी शहरातील लॅविश अपार्टमेंटमधील घरफोडीत तब्बल १३ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची धक्कादायक माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली आहे. महिन्याभरातील ही दुसरी मोठी घरफोडी असल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जकात नाक्याजवळील लॅविश अपार्टमेंटमध्ये राहणारे आणि आठवडा बाजारात फळे विकणारे संतोष भाबुद्रे यांच्या घरात ही घटना घडली. शनिवारी संतोष भाबुद्रे काही कामासाठी बाहेर गेले होते, तर त्यांची पत्नी, मुलगा आणि मावशी रानतळे येथील पिकनिक स्पॉटवर विरंगुळ्यासाठी गेले होते. भाबुद्रे घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि आतील कपाटे विस्कटलेली होती. त्यावेळी त्यांना घरातील ९ लाख रुपये रोख आणि सुमारे ४ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे चोरट्याला परिसराची माहिती असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

शहरात एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही अशा धाडसी चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी कोंडये येथेही घरफोडीची घटना घडली होती. लॅविश अपार्टमेंटमध्ये ज्या फ्लॅटमध्ये चोरी झाली, त्या फ्लोअरवर एकूण ११ फ्लॅट आहेत, त्यापैकी तीन फ्लॅट कायमस्वरूपी बंद असतात, तर इतर वापरात आहेत. मालक बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी ही मोठी घरफोडी केली. या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या चोरट्यांचा छडा लावून त्यांना गजाआड करणे हे पोलिसांसाठी आता एक मोठे आव्हान बनले आहे.

Total Visitor Counter

2682762
Share This Article