मुंबई : माधुरी ऊर्फ महादेवी हत्तिणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर पुनर्वसन केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असून त्यासाठी गुजरातमधील ‘वनतारा’ संस्थेने त्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बुधवारी मुंबईत चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली. दिल्लीतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली.
महादेवी हत्तिणीचा ताबा परत मिळविण्यासाठी नांदणी मठाच्या व्यवस्थापनाकडून आणि राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्यात येणार आहे. या याचिकेत सहभागी होण्याचा निर्णय वनतारा व्यवस्थापनाने घेतला असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तिणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असे स्पष्टीकरण वनतारा व्यवस्थापनाकडून फडणवीस यांच्याकडे करण्यात आले.
महादेवी हत्तिणीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तिला वनतारा संस्थेमध्ये पाठविले आहे. त्यामुळे वनताराच्या देखरेखीखाली नांदणी मठाजवळच पुनवर्ससन केंद्र उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारने सुचविला आहे. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे. पुनर्वसन केंद्र उभारल्यास हत्तिणीला नांदणीला आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळू शकेल, अशी सरकारला आशा आहे.
‘वनतारा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापुरात
महादेवी उर्फ माधुरी हत्ती नांदणी मठाला परत देण्याची वनतारा पशुसंग्रहालयाची तयारी आहे. तेथे ‘वनतारा’च्यावतीने जागतिक दर्जाचे हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्यात येईल. याकरिता सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठ, वनतारा व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुनरावलोकन याचिका दाखल केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी बुधवारी येथे केले.
नांदणी जैन मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती हा न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात मधील वनतारा पशु संग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात वनतारा विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. याची दखल घेऊन चार दिवसांपूर्वी वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी हे कोल्हापुरात आले होते. त्यानंतरही कोल्हापुरात जनक्षोभ वाढत असल्याने ते आज पुन्हा कोल्हापुरात आले.
प्रारंभी त्यांनी नांदणी मठात जाऊन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले होते. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे या नियोजनात बदल करण्यात आला. यानंतर कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये मठाधीश, विहान करणी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, कृष्णराज महाडिक आदींमध्ये बैठक झाली.
केंद्र सकारात्मक : शिवसेनेचा दावा
महादेवी हत्तिणीला परत आणण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी नमूद केले. नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी त्यांना स्थानिक जनतेच्या भावनांबाबत माहिती देण्यात आली. त्यावर जनतेच्या श्रद्धेचा विचार करता, महादेवीला नांदणी मठात परत आणण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आल्याचे माने यांनी समाजमाध्यमावरील प्रतिक्रियेत स्पष्ट केले.
‘महादेवी’ कोल्हापुरात परतणार, वनतारा संस्थेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा; पुनर्वसन केंद्राचा राज्याकडून प्रस्ताव
