रत्नागिरी: संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय 2030 (SDG 2030) उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या सन 2015-16 ते 2022-23 या कालावधीतील जिल्हा निर्देशक आराखडा प्रगतीमापन अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निवास यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता एम एस कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आदी उपस्थित होते.
हा अहवाल जिल्हा स्तरावर शाश्वत विकास ध्येयांच्या प्रगतीचे मापन करण्यासाठी महत्त्वाचा असून, यामध्ये 17 ध्येयांतील 120 निर्देशकांची सन 2015-16 ते 2022-23 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे.
पार्श्वभूमी: संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व (193) सदस्य राष्ट्रांनी 25 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या 70 व्या सर्वसाधारण सभेत ‘शाश्वत विकास ध्येय 2030’ उपक्रम स्वीकारला होता. या उपक्रमांतर्गत 17 शाश्वत विकास ध्येये आणि 169 लक्ष्ये निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रस्तरावर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत तर राज्यस्तरावर या ध्येयांच्या प्रगतीचा आधाररेषा आणि प्रगतीमापन अहवाल प्रकाशित केला जातो. याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्याचा हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.