GRAMIN SEARCH BANNER

कोकणात अवकाळी पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात, कृषी विद्यापीठाचा सतर्कतेचा इशारा

Gramin Varta
97 Views

दापोली/प्रतिनिधी: रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन पडत असतानाच आता हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आगामी दोन दिवसांत या दोन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा आणि काजूला बसण्याची शक्यता असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जारी केला असून, सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या पूर्वानुमानुसार, १८ आणि १९ मार्च रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा सुटण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची अत्यंत शक्यता आहे. सध्या आंब्याचे पीक फळधारणा ते काढणीच्या अवस्थेत आहे. अशा वेळी पाऊस आणि वारा आल्यास अकाली फळगळ होण्याची आणि फळांच्या गुणवत्तेत मोठी घट होण्याची भीती आहे. ज्या बागांमध्ये हापूस आंबा काढणीस तयार झाला आहे, म्हणजेच फळांचा रंग फिकट पिवळसर झाला असून देठाजवळ खड्डा पडला आहे, अशा ८० ते ८५ टक्के पक्वतेच्या फळांची ‘नूतन’ झेल्याच्या साहाय्याने देठासह अलगद काढणी करावी. ही काढलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांचे नुकसान टाळावे, असे कृषी विद्यापीठाने सुचवले आहे.

काजू पिकाबाबतही अशीच चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काजू सध्या पक्वता ते काढणीच्या अवस्थेत असून, पावसामुळे बियांची अकाली गळ होऊ शकते. शेतकऱ्यांनी दोन दिवसाआड पक्व काजू बी आणि बोंडूंची वेचणी करावी. बी स्वच्छ पाण्याने धुवून तीन दिवस उन्हात चांगली वाळवावी आणि त्यानंतरच गोणपाटात भरून कोरड्या जागी ठेवावी. वादळाची शक्यता पाहता, परिपक्व काजू बियांची लवकरात लवकर काढणी पूर्ण करावी आणि उघड्यावर वाळत ठेवलेल्या बिया पावसापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.

केवळ आंबा-काजूच नाही, तर नवीन फळबाग लागवड, भाजीपाला आणि कडधान्य पिकांनाही या अवकाळीचा धोका आहे. रत्नागिरीत १८ व १९ मार्च, तर रायगडमध्ये १९ मार्च रोजी मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित असल्याने नव्याने लागवड केलेल्या आंबा, काजू, नारळ व सुपारीच्या रोपांना आधार द्यावा, जेणेकरून ती वाऱ्याने आडवी पडणार नाहीत. वांगी, मिरची, टोमॅटो यांसारख्या भाजीपाला पिकांची आणि पक्व कलिंगड फळांची काढणी त्वरित करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या कडधान्य पिकांच्या शेंगा पावसात भिजून तडकू शकतात, त्यामुळे त्यांचीही वेळीच काढणी करावी.

या वादळी हवामानाचा धोका पशुधनालाही होऊ शकतो. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना झाडाखाली बांधू नये. त्यांना सुरक्षित गोठ्यात किंवा शेडमध्ये ठेवावे. तसेच, कुक्कुटपालन करणाऱ्यांनी वाऱ्याच्या आणि पावसाच्या शिडकाव्यापासून पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी शेड कापडाने झाकून ठेवावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत. बदलत्या हवामानामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी या सल्ल्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

Total Visitor Counter

3181345
Share This Article