मुंबई : कोकणात दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे जपलेल्या हापूस आंबा आणि काजूच्या बागा काही क्षणांत खाक होत असून, या गंभीर प्रश्नावर आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले. कोकणातील बागायतदारांचे होणारे अतोनात नुकसान पाहता, शासनाने वणव्यामुळे बाधित होणाऱ्या बागांना पीक विमा योजना किंवा विशेष आग विमा संरक्षण देण्याचे स्पष्ट धोरण निश्चित करावे, अशी आक्रमक मागणी निकम यांनी सभागृहात केली. वणव्यामुळे बागा जळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ हतबलता उरते, त्यामुळे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी आणि वणवा लावणारे समाजकंटक आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
आमदार शेखर निकम यांनी मांडलेल्या या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री गणेश नाईक यांनी कोकणातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण अधिक असले तरी रत्नागिरीत बहुतांश बागा खाजगी मालकीच्या असल्याने याकडे सामुदायिक जबाबदारी म्हणून पाहिले जाईल, असे त्यांनी नमूद केले. हा विषय कृषी विभागाशी संबंधित असल्याने कृषि मंत्र्यांशी चर्चा करून वणव्यामुळे बाधित होणाऱ्या बागांना इन्शुरन्स आणि इतर मदत कशी मिळवून देता येईल, याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले. कोकणातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न थेट विधानसभेत प्रभावीपणे मांडल्याबद्दल बागायतदार वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.






