रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये श्वानदंश, सर्पदंश आणि विंचूदंशाचे ४६ हजार ७७ रुग्ण नोंदवले गेले. त्यामध्ये श्वानदंशामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार या तीन प्रकारांची बाधा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
२०२० ते २०२४ या कालावधीत एकूण १८ हजार ३१७ व्यक्तींना श्वानदंश झाल्याचे निष्पन्न झाले आहे. २०२० मध्ये ४,६२७, २०२१ मध्ये ४,३११, २०२२ मध्ये ३,०४५, २०२३ मध्ये २,१६५ रुग्ण नोंदवले गेले असून, यापैकी २०२० मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
या कालावधीत २३ हजार ३९४ व्यक्तींना विंचूदंश झाल्याचे नमूद झाले असून, २०२० मध्ये सर्वाधिक ६,५०९ रुग्ण होते. त्यानंतर २०२१ मध्ये ६,८५७, २०२२ मध्ये ४,१४८, २०२३ मध्ये ३,९६३ आणि २०२४ मध्ये २,९१७ जणांना विंचूदंश झाला.
तसेच सर्पदंशाचे प्रमाणही चिंताजनक असून, ४,३६६ रुग्णांना सर्पदंशामुळे उपचार घ्यावे लागले. यामध्ये २०२० मध्ये ९१९, २०२१ मध्ये १,१९०, २०२२ मध्ये १,०६२, २०२३ मध्ये ७०९, आणि २०२४ मध्ये ४८६ अशी आकडेवारी आहे.
या सर्व घटनांवर उपचार करताना शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लस (इंजेक्शन) उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. मात्र अनेक प्राथमिक केंद्रांमध्ये लशीची कमतरता जाणवत असून, वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे सर्पदंश, विंचूदंश आणि श्वानदंशासाठी लागणाऱ्या लशींचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वारंवार होत आहे.
रत्नागिरी : पाच वर्षांत श्वान, सर्प आणि विंचूदंशाचे ४६ हजारांहून अधिक रुग्ण
