संभाव्य धोका टळला, रुग्ण आणि नागरिकांकडून आभार
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मदत केंद्राच्या सिलिंगवरील ‘पीओपी’ (प्लास्टर ऑफ पॅरिस) ला मोठे भगदाड पडल्याची आणि ते खाली कोसळण्याची गंभीर घटना ‘ग्रामीण वार्ता’ने प्रसिद्ध करताच रुग्णालय प्रशासनाला जाग आली आहे. या बातमीची त्वरित दखल घेत प्रशासनाने आज युध्द पातळीवर कामाला सुरुवात केली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी ‘ग्रामीण वार्ता’चे विशेष आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ, जेथे रुग्णांचे मदत केंद्र आहे, तेथील नवीन पीओपीचे सिलिंग कोसळले होते. सुदैवाने, या दुर्घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी थोडक्यात टळली, अन्यथा अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असते. या घटनेमुळे इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
ज्या ठिकाणी हे भगदाड पडले होते, तेथे दररोज मोठ्या संख्येने वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले तसेच रुग्णांचे नातेवाईक यांची ये-जा असते. हा प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळल्यास मोठी हानी होण्याची दाट शक्यता होती. रुग्णालय प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा धोका उभा असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे ‘ग्रामीण वार्ता’ने तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली.
‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीच्या दणक्याने रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. त्वरित आणि तत्परतेने या पीओपी भगदाडाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे इमारतीतून ये-जा करणाऱ्या रुग्णांवरील आणि नागरिकांवरील संभाव्य धोका टळला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण, तसेच नागरिक आणि नातेवाईक यांनी ‘ग्रामीण वार्ता’ने केलेल्या जनहितार्थ कामाबद्दल विशेष आभार व्यक्त केले आहेत. ग्रामीण वार्ताच्या बातमीमुळे प्रशासनाने वेळेवर कारवाई केल्याने मोठे संकट टळल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.