महिला संघटना आक्रमक, गाव पुढाऱ्याविरोधात तीव्र संताप
राजापूर: तालुक्यातील कशेळी (आगवेकरवाडी) येथे एका ४५ वर्षीय संतोष बबन मांडवकर या विकृत व्यक्तीने तरुणीच्या मोबाईलवर सतत अश्लील संदेश व कॉल करून तिचा विनयभंग केला. गुरुवार, २५ सप्टेंबर रात्री ८ वाजता घडलेल्या या घटनेनंतर सागरी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ७८(२) व ७९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मध्यरात्री राजकीय गोटातील दोन गाव पुढारी थेट पोलीस ठाण्यात धडकले. पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या त्यांच्या दबावयंत्रणेमुळे परिसरात संताप उसळला आहे. महिला संघटनांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले की आरोपीला वाचवण्याचा हा प्रकार सहन केला जाणार नाही आणि या दोन्ही पुढाऱ्यांची माहिती वरिष्ठांकडे पोहोचवली जाईल.
“महिला सुरक्षिततेच्या बाबतीत पोलिस कोणत्याही दबावाखाली येणार नाहीत. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल आणि फास्ट-ट्रॅक सुनावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी ठाम सांगितले. विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनीही तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, महिला संघटनांचा इशारा “आरोपीवर कडक कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारू. राजकीय हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही!”
नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात घडलेल्या या घृणास्पद घटनेमुळे संपूर्ण राजापूर हादरले असून, महिलांनी उघडपणे घोषणा दिल्य.“आरोपीला राजकीय छत्री नाही, तुरुंगच हक्काचा!”
ब्रेकिंग : राजापुरात तरुणीचा विनयभंग; तरुणावर गुन्हा, आरोपीला वाचवण्याचा गाव पुढाऱ्याचा डाव






