GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये पत्रकारावर जीवघेणा हल्ला; उपोषणाची बातमी कव्हर करणाऱ्या पत्रकाराला जमावाकडून बेदम मारहाण

Gramin Varta
358 Views

चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथे कर्तव्य बजावत असलेल्या एका दूरदर्शनच्या पत्रकारावर ३० ते ४० अज्ञात गुंडांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात सुरू असलेल्या एका उपोषणाची बातमी करण्यासाठी गेलेले पत्रकार दीपक भागवत यांना या जमावाने लक्ष्य केले. बातमीचे चित्रीकरण आणि संकलन करत असताना अचानक आलेल्या या अज्ञात टोळक्याने त्यांना घेरून जबर मारहाण केली. या भीषण हल्ल्यात भागवत हे गंभीर जखमी झाले असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे चिपळूण शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पत्रकारांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दीपक भागवत यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका सार्वजनिक विषयावर उपोषण सुरू असताना आणि त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असताना पत्रकारावर अशा प्रकारे संघटित हल्ला होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3206341
Share This Article